बारामती (प्रतिनिधी – दि. २५): पुणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पक्ष अंतर्गत पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीत मनोज कोकणे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत सातत्याने केलेल्या निष्ठावान व सक्रिय कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या मान्यतेने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. संघटन वाढीसाठी सातत्याने केलेल्या कामाची ही पावती मानली जात असून कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मनोज कोकणे म्हणाले की, “पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून बूथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करणे हे माझे पहिले उद्दिष्ट असेल. आगामी काळात अधिक जोमाने आणि समर्पित भावनेने कार्य करण्याचा माझा संकल्प आहे.”
दरम्यान, को-हाळे, वडगाव निंबाळकर, वाकी, चोपडज, कानाडवाडी, निंबुत व मढाळे परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही नियुक्ती आगामी संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
