(प्रतिनिधी) – बीड शहरात सुरू असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला असून मूळ विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला परीक्षा देण्यासाठी बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रावरील सतर्क पर्यवेक्षिकेच्या प्रसंगावधानामुळे हा गैरप्रकार उघड झाला असून संबंधित दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या दहावीच्या परीक्षेचा पेपर सुरू असताना शहरातील यशवंत विद्यालय येथे हा प्रकार घडला. परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांची ओळखपत्रे तपासण्याचे नियमित काम सुरू असताना एका परीक्षार्थ्याकडे मूळ हॉलतिकीटाऐवजी झेरॉक्स प्रत असल्याचे पर्यवेक्षिकेच्या निदर्शनास आले.
सदर झेरॉक्स हॉलतिकीटवर शाळेचा अधिकृत शिक्का नसल्याने संशय अधिक बळावला. पुढील चौकशीत हॉलतिकीटवरील फोटो बदलण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. यानंतर परीक्षा केंद्र प्रशासनाने शिक्षण मंडळाकडून प्राप्त अधिकृत नोंदींशी विद्यार्थ्याची पडताळणी केली असता, प्रत्यक्ष परीक्षा देणारी व्यक्ती आणि मूळ परीक्षार्थी वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारातून संगनमत करून शिक्षण मंडळाची दिशाभूल करत परीक्षा प्रक्रियेत फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. केंद्र संचालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवरील ओळख पडताळणी आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
