सोमेश्वर कारखान्यात आरोप-प्रत्यारोपांना धार ; संचालक अभिजीत काकडे यांचा कृषी समितीच्या मेळाव्यात चेअरमन यांच्यावर निशाणा

निंबूत : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे यांनी विद्यमान चेअरमन यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चेअरमन यांनी कोणत्याही संचालकाला विश्वासात न घेता सुमारे दीड महिन्यापूर्वीच कारखान्याचा वार्षिक अहवाल तयार केल्याचा दावा काकडे यांनी केला.कृषी समितीचे अध्यक्ष सतीश भैय्या काकडे यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विद्यमान चेअरमन यांच्यावर गेल्या १०-१२ वर्षांच्या कारभारात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना चेअरमन यांनी, ‘तुम्ही विषाची परीक्षा घेऊ नका’, असे वक्तव्य केल्याचे सांगण्यात आले.यावरून अभिजीत काकडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत चेअरमन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. “आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीचा मान-सन्मान राखून बोलायला हवे. ते असे कसे बोलू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.पुढे चेअरमन यांना थेट आव्हान देताना काकडे म्हणाले, “पक्ष सोडा, मैदानात या. तुम्ही काय होता आणि काय आहात, हे सर्व मी सांगू शकतो. हा अभिजीत काकडे एकटाच बस. आमचेही वडील आहेत आणि त्यांचा आम्हाला आदर आहे.”दरम्यान, कारखान्याच्या कारभारावरून सुरू असलेल्या या वादाला आता राजकीय तसेच सहकार क्षेत्रातही वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “वेळ आल्यावर अहंकार माणसाला घेऊन जातो आणि तो तुम्हाला घेऊन जाणार,” अशा शब्दांत अभिजीत काकडे यांनी विद्यमान चेअरमन यांना सुनावले.या आरोपांवर विद्यमान चेअरमन यांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नसून, त्यांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर या वादातील दोन्ही बाजू अधिक स्पष्ट होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!