
बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून बारामती नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर नगरपरिषदेसमोर सभा घेण्यात आली. त्यानंतर बारामती नगरपरिषद अधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रावहिनी पवार तसेच बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना संघटनेच्या वतीने यापूर्वी निवेदन देण्यात आले होते.नवीन ठेक्यात सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणीनवीन ठेक्यामध्ये सध्या बारामती नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना कायम ठेवण्यात यावे व कोणत्याही कामगाराला कमी करू नये, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. तसेच कामगारांना नियमानुसार किमान वेतन, पी.एफ., ESIS, बोनस आणि साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.पी.एफ. व ESIS बाबत चौकशीची मागणीतत्कालीन ठेकेदारांनी कामगारांच्या पी.एफ. व ESISची रक्कम नियमानुसार भरली आहे किंवा नाही, याची सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशी करताना संबंधित कामगारांचे म्हणणे ऐकून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम परत देण्यात येऊ नये. तसेच दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.स्थानिक ठेकेदारांना संधी देण्याची मागणीबारामतीतील स्थानिक ठेकेदारांना ठेका मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार नियम व अटी शिथिल करण्यात याव्यात. तसेच दर तीन महिन्यांनी कंत्राटी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात यावी आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.अपघाताचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नयेकामगार कामावर असताना वाहनाचा अपघात झाल्यास त्याचा खर्च कामगारांच्या वेतनातून कपात करू नये, तर संबंधित ठेकेदाराने तो खर्च करावा. प्रत्येक कामगाराला पेमेंट स्लिप देण्यात यावी तसेच वेतन दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत अदा करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.कामावरून कमी करताना नियमानुसार नोटीस देण्याची मागणीकंत्राटी कामगाराला कामावरून कमी करताना नियमानुसार नोटीस देण्यात यावी. कामाच्या कालावधीत कामगाराचा अपघात झाल्यास त्याचा वैद्यकीय खर्च संबंधित ठेकेदाराने करावा. तसेच उपचार व रजेच्या कालावधीतील वेतनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.सभेत पदाधिकाऱ्यांची मनोगतेमोर्चानंतर झालेल्या सभेत नगरसेवक आरती शेंडगे (गव्हाळे), सामाजिक कार्यकर्ते मुनीर तांबोळी, अक्षय खरात, भारतीय युवा पँथर संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभम गायकवाड आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.त्यानंतर सभेच्या ठिकाणी बारामती नगरपरिषद अधिकाऱ्यांना संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कामगारांच्या हक्कांशी संबंधित मागण्यांची तातडीने दखल घेऊन नवीन कंत्राट प्रक्रियेत कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितमोर्चाबाबत निवेदन देताना जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे, बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष शंकर शिंदे, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, सहसंघटक स्वप्निल लोंढे, बारामती तालुकाध्यक्ष विशाल जगताप, तालुका कार्याध्यक्ष प्रेम खरात, बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, एमआयडीसी विभाग अध्यक्ष शहाजी बाळू कांबळे, उपाध्यक्ष भारती साबळे, उपाध्यक्ष स्वाती गायकवाड, कार्याध्यक्ष सरिता सरतापे, सहकार्याध्यक्ष सुप्रिया खरात, संघटक रेश्मा सावंत, सरचिटणीस निलेश काकडे, संपर्कप्रमुख शितल भोसले, सदस्य नाना बगाडे, रितेश जाधव, विकास माने, विजय मस्के, बाप्पा तोरणे, अक्षय सरोदे तसेच भारतीय युवा पँथर संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्ष सुषमा पवार, सदस्य मंजुषा भंडारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
