
बारामती | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वनपाल पदावर कार्यरत असलेल्या लोकसेवकाला ६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. जहीर सिराज शेख (वय ४७, पद वनपाल, वर्ग-३) असे संबंधित लोकसेवकाचे नाव असून, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदार हे ६० वर्षीय शेतकरी असून, त्यांची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील माती वाहून जाऊन नदीपात्रात साचल्याची तक्रार त्यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दिली होती.या प्रकरणात संबंधित लोकसेवकाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी तक्रारदाराच्या शेतात येऊन काम बंद करण्यास सांगितले होते. तसेच, तक्रारदारावर कारवाई करण्याची भीती घालून माती भराव करण्यासाठी स्वतःसाठी आणि सहकारी भुमरे मेंढ यांच्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार २३ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान संबंधित लोकसेवकाने तक्रारदाराकडून यापूर्वी ४ हजार रुपये स्वीकारल्याचे आणि उर्वरित ६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे विभागाने नमूद केले आहे.त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी माळेगाव येथील आयटीआयसमोरील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान उर्वरित ६ हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून संबंधित लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये माळेगाव पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या पथकाने केली. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
