*बारामती प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून संबंधित तरुणीने यापूर्वी व्यक्त केलेल्या भूमिकेपासून माघार घेत न्यायालयासमोर आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
भिगवण येथील तरुणी १७ फेब्रुवारी रोजी मुस्लीम समाजातील एका तरुणासोबत घरातून निघून गेल्यानंतर प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी ती संबंधित तरुणासह बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली होती. पुढे न्यायालयात हजर केल्यानंतर तिने त्या तरुणासोबतच राहण्याची इच्छा स्पष्टपणे नोंदवली होती.
दरम्यान, तरुणीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने न्यायालयाच्या आदेशानुसार तिला महिला पुनर्वसन केंद्रात ठेवण्यात आले होते. सुमारे पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर सोमवारी इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिची पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने “कोणाकडे जायचे?” असा प्रश्न विचारला असता तरुणीने “आई आणि मामाकडे जायचे आहे,” असे सांगत आपला पूर्वीचा जबाब बदलला.
याआधी बारामती येथे आई भेटण्यासाठी आली असतानाही तरुणी आईसोबत जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे न्यायालयाने तिला तात्पुरते पुनर्वसन केंद्रात ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र सुधारगृहातील वास्तव्यानंतर तिच्या भूमिकेत झालेला हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पार पडणार असून तरुणीच्या नव्या निवेदनामुळे तपास आणि न्यायालयीन सुनावणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
