
सोमेश्वर नगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या सन २०२४-२५ मधील देशपातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमते’च्या तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला प्राप्त झाला आहे.नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री तथा राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह विविध राज्यांतील मान्यवर उपस्थित होते.कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर नारायण नायकोडे आणि चीफ केमिस्ट शिवशंकर भोसले यांनी पुरस्कार स्वीकारला.गेल्या ९३ वर्षांच्या वाटचालीत सोमेश्वर कारखान्याने विविध पुरस्कार मिळवत आपली गुणवत्ता आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहे. सन २०१३ पासून राज्य व देशपातळीवरील नामांकित संस्थांचे तब्बल १३ पुरस्कार कारखान्याला मिळाले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.या यशाबद्दल कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी, ऊसतोड वाहतूकदार, ऊसतोड मजूर आणि हितचिंतकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.“कामकाजातून कारखान्याची प्रगती व विकासाचा आलेख यापुढेही वाढत राहील,” असा विश्वास कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी व्यक्त केला.
