
फलटण प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित मानसिक त्रासाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या २७ वर्षीय तरुण डॉक्टरने सोमवारी सकाळी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. डॉ. राजेंद्र जगन्नाथ रुपनवर असे मृत डॉक्टरचे नाव आहे.या घटनेनंतर पोलिसांना सापडलेल्या कथित मृत्यूपूर्व चिठ्ठीमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. चिठ्ठीत राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडी (विशेष कार्याधिकारी) यांच्यासह रुग्णालयातील काही वरिष्ठ डॉक्टरांकडून मानसिक दबाव व त्रास दिल्याचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे. या आरोपांमुळे वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. रुपनवर हे काही काळापासून वरिष्ठांच्या कथित जाचामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर प्रशासकीय तसेच मानसिक दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख चिठ्ठीत असल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीमुळे ते नैराश्यात गेले आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत आहे. मात्र, चिठ्ठीत करण्यात आलेले आरोप तपासातून सिद्ध होणे बाकी आहे.आरोग्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेशघटनेची गंभीर दखल राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.चौकशी समितीच्या अहवालानुसार प्राथमिक कारवाई म्हणून जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांत फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.‘अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाने लढा द्यावा’या घटनेवर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील योग्य मार्ग नसल्याचे स्पष्ट केले. अन्याय होत असल्यास संविधानाने आणि कायद्याने दिलेल्या मार्गाचा अवलंब करून त्याविरोधात लढा दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून, तपासादरम्यान जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वासही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.या घटनेमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण, प्रशासकीय दबाव आणि कार्यस्थळी मानसिक वातावरण याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता पोलिस तपास आणि चौकशी समितीच्या अहवालातून या प्रकरणामागील नेमके कारण आणि आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.
