युवकांसाठी नोकरीची मोठी संधी ; मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात रोजगार महामेळावा यशस्वी

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथे महाराष्ट्र शासन यांच्या रोजगार व कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला जिल्हास्तरीय रोजगार महामेळावा उत्साहात पार पडला. या महामेळाव्यात जिल्ह्यातील विविध भागांतील २० नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून एकूण ३५७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी तब्बल १५२ उमेदवारांची विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली.

महामेळाव्याचे उद्घाटन माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृहात पार पडले. उद्घाटक म्हणून प्रसिद्ध उद्योजक आर. एन. बापू उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अभिजीत काकडे देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे होते.

यावेळी व्यवस्थापन समितीचे सचिव सतीश लकडे, कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी, रामेश्वरी पालवी, राजू डोईफोडे तसेच अजय रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी सध्याच्या स्पर्धात्मक काळात युवकांसमोर उभ्या असलेल्या रोजगाराच्या आव्हानांचा उल्लेख करत अशा रोजगार मेळाव्यांचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालयातर्फे अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कौशल्य विकास अधिकारी राजेश धर्माधिकारी यांनी शासन ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत युवकांनी स्वतःमध्ये पात्रता आणि कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार मेळावा समन्वयक प्रा. राहुल खरात यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आरती भाग यांनी मानले. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!