बारामती तालुक्यातील गॅस वितरक कामगारांच्या शोषणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोमेश्वरनगर, दि. १८ (प्रतिनिधी) : पुणे व सातारा जिल्ह्यांतील गॅस वितरण व्यवस्थेत कार्यरत कामगारांना कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश किसनराव यादव यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.यादव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पुणे व सातारा जिल्ह्यांतील एचपी, भारत व इंडियन गॅस एजन्सींमध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करणाऱ्या काही कामगारांना अद्याप नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आलेले नाही. तसेच शासनाच्या किमान वेतन नियमानुसार वेतन न देता अत्यल्प वेतन रोखीने दिले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.तक्रारीतील प्रमुख आरोप पुढीलप्रमाणे आहेत :पीएफ, ईएसआयसी व ग्रॅच्युइटीचा लाभ नाही : कामगारांना भविष्य निर्वाह निधी (PF), कर्मचारी राज्य विमा (ESIC) आणि ग्रॅच्युइटीसारखे वैधानिक लाभ मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सिलिंडर वाहतूक करताना आवश्यक असलेले हातमोजे, सेफ्टी शूज यांसारखी सुरक्षा साधनेही पुरवली जात नसल्याचे निवेदनात नमूद आहे.जादा कामाचा मोबदला मिळत नसल्याचा आरोप : कामगारांकडून दिवसाला आठ तासांपेक्षा अधिक काम करून घेतले जाते; मात्र अतिरिक्त कामाचा ओव्हरटाइम मोबदला दिला जात नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे.गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवरही आरोप : गॅस कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरकडे वितरकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असताना, कामगारांच्या कथित समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची कामगार विभागाच्या विशेष पथकाद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी. संबंधित गॅस वितरक तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित गॅस एजन्सी तसेच गॅस कंपन्यांच्या सेल्स विभागाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!