सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक दाम्पत्याने एकत्र विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. पत्नीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून सुरू असलेला मानसिक छळ, वारंवार धमक्या तसेच समाजात बदनामी होण्याच्या भीतीमुळे दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
मृतांची नावे सोमनाथ धानोप्पा पाटील (वय अंदाजे ३५) व श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय अंदाजे ३०) अशी असून ते एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते. किरकोळ किराणा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. शुक्रवारी दुपारी दोघांनी घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात येताच मुलांनी नातेवाईकांना माहिती दिली; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत विजयपूर येथील अभिषेक कोरे याचे नाव स्पष्टपणे नमूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत असून वारंवार फोन, भेटीगाठी तसेच धमक्यांद्वारे त्रास देत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे. दाम्पत्याला बदनाम करण्याची धमकी देण्यात येत असल्याने सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचेही त्यात नमूद आहे.
चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर पोलिसांनी अभिषेक कोरे याला विजयपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन चिमुकल्यांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने शोककळा पसरली आहे.
