ई-चलन दंड थकवल्यास परवाना रद्द होणार; पुणे वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

पुणे : शहरातील वाहतूक नियमभंग प्रकरणांमध्ये प्रलंबित असलेला ई-चलन दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. दंडाची रक्कम नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांच्या आत न भरल्यास संबंधित वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा Pune Traffic Police यांनी दिला आहे.

शहरात मार्च २०१९ पासून ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अनेक वाहनचालकांनी ई-चलनांकडे दुर्लक्ष केल्याने मोठ्या प्रमाणात दंड प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी आणि पारदर्शक पद्धतीने दंड वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

अधिकृत नोटीस पाठविणार

ई-चलन प्रलंबित असलेल्या वाहनमालकांना अधिकृत नोटीस पाठविण्यात येणार असून ती नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर MHPECH-G या अधिकृत शॉर्ट कोडवरून एसएमएसद्वारे पाठवली जाणार आहे. ही नोटीस २६, २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीतच पाठवली जाणार आहे. या कालावधीबाहेर येणारे संदेश संशयास्पद समजावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दंड न भरल्यास कडक कारवाई

नोटीस मिळाल्यानंतर ३० दिवसांत दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव Regional Transport Office (आरटीओ) कडे पाठविण्यात येईल. तसेच संबंधित ई-चलनाचा खटला न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

दंड भरण्याचे पर्याय

वाहनचालकांना अधिकृत संकेतस्थळ, Pune Traffic Police App तसेच वाहतूक विभाग कार्यालयातील ई-चलन मशिनवर क्यूआर कोड, डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे दंड भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

वाहतूक पोलिसांकडून कोणतीही APK फाइल पाठविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ओटीपी कोणालाही शेअर करू नये तसेच केवळ अधिकृत पेमेंट पद्धतींचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद लिंक, कॉल किंवा संदेश आल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही नागरिकांना सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!