नाशिक प्रतिनिधी : नाशिक येथे आयोजित विश्व मराठी संमेलनाच्या चौथ्या पर्वानिमित्त मराठी भाषा गौरव दिन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित भाषा प्रयोगशाळा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. मराठी भाषा सक्तीची असली तरी तिचे प्रभावी अध्यापन सर्वत्र होत नसल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यांचे वैज्ञानिक मूल्यमापन आणि संवादकौशल्य वृद्धी हे या प्रयोगाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रजनगरी’ येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. केटीएचएम महाविद्यालय परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मुख्य मंचावर विविध साहित्य व भाषा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
एआय आधारित भाषाशिक्षणाचा आराखडा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एआय एजंटशी संवाद साधत विद्यार्थ्यांचे बोलणे, उच्चार, शब्दसंपत्ती आणि अभिव्यक्ती यांचे विश्लेषण केले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ गुणपत्रिका नव्हे तर भाषिक प्रगतीचा सविस्तर अहवाल उपलब्ध होईल. मराठी बोलण्याचा सराव, उच्चारशुद्धता आणि संवादकौशल्य वाढविण्यासाठी डिजिटल संवादमाध्यमांचा वापर केला जाणार असून शिक्षकांनाही आधुनिक अध्यापन साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
एआयच्या साहित्यनिर्मिती क्षमतेचा उल्लेख करत त्यांनी ChatGPT सारख्या साधनांमधून कविता लेखन शक्य असल्याचे सांगितले; मात्र मानवी संवेदना, नवविचार आणि सर्जनशीलतेचे मूळ साहित्यिकांमध्येच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
परंपरेचा संदर्भ, भविष्याचा संकल्प
मराठी भाषेच्या ऐतिहासिक परंपरेचा उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभारासाठी प्रमाणभाषेचा पाया घातला, तर विनायक दामोदर सावरकर यांनी भाषाशुद्धीची चळवळ राबविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या परंपरेला नवतंत्रज्ञानाची जोड देत मराठीला ज्ञान-विज्ञानाची भाषा बनविण्याचा राज्य सरकारचा संकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
कांदा प्रश्नावर लवकरच बैठक
नाशिक परिसरातील कांदा दरप्रश्न तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढील संमेलन विदर्भात?
विश्व मराठी संमेलन हे जागतिक व्यासपीठ असल्याने पुढील संमेलन विदर्भात आयोजित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मराठी उपजीविकेची भाषा व्हावी — सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मराठीला ज्ञान, विज्ञान आणि उपजीविकेची भाषा बनविण्याची गरज अधोरेखित केली. दिवंगत अजित पवार यांनी लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी निधी दिल्याची आठवण करून मराठीच्या जागतिक विस्ताराची दिशा स्पष्ट केली.
भाषा विभागाचा निधी वाढ — उदय सामंत
उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा विभागाचा निधी ६५ कोटी रुपयांवरून २६५ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती दिली. मुंबईतील मराठी भवनाचे काम २७ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती स्थापन करून ग्रामीण साहित्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले.
साहित्यिकांचा गौरव
या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ‘साहित्यभूषण’ पुरस्कार, श्रीनिवास कुलकर्णी यांना ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार, तर डॉ. दिलीप धोंडगे यांना ‘डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांसह विविध संस्था व व्यक्तींनाही गौरविण्यात आले.
विशेष उपक्रमांची घोषणा
यावेळी ‘आपलं मंत्रालय’ या शासकीय मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. बृहन्महाराष्ट्र मंडळांची संख्या १७ वरून ७५ पर्यंत वाढविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. निवृत्ती महाराज समाधी संस्थानासाठी ५० लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला तसेच ‘शाहीर वामनदादा कर्डक मंच’ असे रावसाहेब थोरात सभागृहाचे नामकरण करण्यात आले.
दिवसभर ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा मराठीत वापर’, ‘मराठी प्रकाशनांचे बदलते प्रवाह’ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांना साहित्यिक, अभ्यासक व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
