साहेबराव काकडे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

प्रतिनिधी – साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, येथील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ ग्रामीण कवी चंद्रकांत चाबुकस्वार यांनी ‘कवितेची सर्जनशीलता’या विषयावर कवितेच्या सादरीकरणासह मांडणी केली.
तू बनतोस तर साहेब बन
पण बाळा पहिला माणूस बन..!
या त्यांच्या कवितेला सर्वच रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांनी आपल्या कवितेतून गावखेड्यातील कृषी संस्कृती, कुटुंबव्यवस्था, आजच्या शेतीचे व शेतकऱ्यांचे वास्तव नेमकेपणाने अभिव्यक्त केले.
कशाला मी लावू कुठे दर्शनाला रांग
आई माझी रुक्मिणी बाप माझा पांडुरंग..!!
अशा अनेक कवितांची निर्मिती प्रक्रिया उलगडून त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात कवितांचे सादरीकरण केले या सर्वच कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे हे होते. त्यांनी सांगितले की, मराठी भाषेला समृद्ध परंपरा असून तो वारसा आणि संस्कृती जतन करणे आपल्या पिढीचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांना आणि मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. जया कदम यांनी केले, त्यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्यावर भाष्य करून त्यांना आदरांजली वाहिली. सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण देशमुख यांनी केले तर आभार प्रा. नीलम देवकाते यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!