
निरा, प्रतिनिधी :संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत भावपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे निरा नदीतील पवित्र स्नान. यंदाही पारंपरिक प्रथेनुसार माऊलींच्या पालखीचे निरा नदीत विधिवत स्नान करण्यात आले. या सोहळ्याला लाखो वारकरी व भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती लावली.’ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालखी नदीत दाखल होताच भाविकांनी जल्लोष केला. प्रशासनाच्या व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या देखरेखीखाली हा सोहळा सुरक्षितरीत्या पार पडला. नदीकाठावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती.माऊलींच्या पवित्र स्नानाचा हा सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील एक महत्त्वाचा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा मानला जातो. या दिव्य क्षणाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भरलेल्या या सोहळ्यामुळे नीरा नदी परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला.

