सोमेश्वरनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांसाठी “युवा शिक्षण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार, दि. ४ मार्च २०२६ रोजी करण्यात आले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कवी, साहित्यिक विचारवंत व लेखक प्रा. प्रदीप पाटील प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. वायदंडे यांनी कौशल्याधारित युवा शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर शिक्षणाभिमुख दृष्टीकोनातून व आवश्यकतेनुसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी ‘युवा शिक्षण आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सायबर फसवणूक करणाऱ्यांची तसेच फसवणूक होणाऱ्यांची मानसिकता याचे त्यांनी विश्लेषण केले. डिजिटल अरेस्ट, डीप फेक, हनी ट्रॅप, बनावट वेबसाईट, इंटरनेट व डिजिटल पेमेंटद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत त्यांनी उदाहरणांसह माहिती दिली. सोशल मीडियावर अनावश्यक वैयक्तिक माहिती प्रसारित करू नये, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला.
दुसऱ्या सत्रात ‘युवा शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी’ या विषयावर डॉ. राहुल खरात यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक जबाबदारी हा प्रत्येकामध्ये असलेला अंगभूत गुण असून, आपल्या कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी करणे म्हणजे सामाजिक जबाबदारी होय, असे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक जबाबदारीची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय अशी विविध अंगे असून स्वयंप्रेरणा अत्यावश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. “आंधळ्याला योग्य रस्ता दाखवणे हीदेखील सामाजिक जबाबदारीच आहे,” असे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
ही कार्यशाळा प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. पी. वाय. जाधव, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडली. महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सचिव श्री. सतीश लकडे कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.
कार्यशाळेत विविध शाखांतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कु. रुपाली सस्ते व संकेत साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दत्तात्रय जगताप यांनी केले.
