
बारामती दि. ४ सप्टेंबर २०२६ : बारामती शहरातील भिगवण रोड परिसरात एका निवासी इमारतीत राहणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. गंभीर अवस्थेत तिला वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.सदर विद्यार्थिनी बारामतीतील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्स शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. पालकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास आणि परीक्षेच्या ताणाबाबत चिंतित होती. अभ्यास होत नसल्याचे तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याचे ती आई-वडिलांकडे बोलत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.घटनेच्या रात्री ती उशिरापर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर घडलेल्या घटनेत ती गंभीर जखमी झाली. कुटुंबीय व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काही काळ ती शुद्धीवर होती, अशी माहिती पालकांनी पोलिसांना दिली. मात्र त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाहीपालक किंवा नातेवाईकांनी सद्यस्थितीत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार अथवा संशय व्यक्त केलेला नाही. अभ्यास व परीक्षेचा ताण हे पालकांकडून सांगण्यात आलेले प्राथमिक कारण असले तरी, घटनेमागील नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही.या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी करण्यात येत आहे. विद्यार्थिनीबाबत यापूर्वीही घरातून निघून गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाल्याची माहिती असून, त्या प्रकरणातील कागदपत्रे, जबाब आणि तपासातील बाबींचीही सद्य घटनेच्या अनुषंगाने पडताळणी केली जात आहे.डिजिटल माहिती व सीसीटीव्हीचीही पडताळणीप्राथमिक चौकशीत विद्यार्थिनीकडे स्वतःचा वैयक्तिक मोबाईल फोन नसल्याची माहिती समोर आली आहे. ती आवश्यकतेनुसार पालकांच्या मोबाईलचा वापर करत होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मोबाईलमधील उपलब्ध डिजिटल माहितीची पडताळणी करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.तसेच घटनास्थळाची पाहणी, आवश्यक पंचनामे, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे आणि डिजिटल माहिती यांची तपासणी केली जात आहे. पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी, शिक्षक तसेच आवश्यक संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन घटनेमागील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.अभ्यासाचा ताण याव्यतिरिक्त वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणती पार्श्वभूमी होती का, तसेच कोणाकडून त्रास, दबाव किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी बाब घडली होती का, याचीही निष्पक्षपणे पडताळणी करण्यात येत आहे.अकस्मात मृत्यूची नोंदसदर प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास बारामती शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.दरम्यान, मृत विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याने तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी कोणतीही वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून नागरिक आणि प्रसारमाध्यमांना करण्यात आले आहे.
