मध्यरात्री बारामती शहर पोलिसांची सतर्क गस्त ; विनानंबर प्लेट स्कार्पिओची तपासणी

बारामती, दि. ५ सप्टेंबर : बारामती शहरातील रात्रीची सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहने व व्यक्तींची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान मध्यरात्री विनानंबरची काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ संशयास्पद स्थितीत आढळून आली. तपासणीदरम्यान चालकाकडे वाहनाची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले.

तसेच वैद्यकीय तपासणीत चालक मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे निष्पन्न झाले.दि. ५ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलिसांचे पथक रात्रीची गस्त घालत होते. खंडोबानगर, मोरगाव रोडवरील पेट्रोलपंपासमोर काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. विशेष म्हणजे वाहनाच्या पुढील व मागील बाजूस नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट दिसून आली नाही.पोलिसांनी वाहन थांबवून चालकाकडे चौकशी केली. त्याचे नाव-पत्ता, मध्यरात्री त्या परिसरात फिरण्याचे कारण तसेच वाहनाच्या मालकीबाबत माहिती घेण्यात आली.

यावेळी चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स व वाहनाची आवश्यक कागदपत्रे मागण्यात आली. मात्र, तपासणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत.चौकशीदरम्यान चालकाच्या तोंडातून मद्याचा उग्र वास येत असल्याने पोलिसांना तो मद्याच्या प्रभावाखाली असल्याचा संशय आला. त्यानंतर त्याला बारामती शहर पोलीस ठाण्यात आणून सिल्वर ज्युबिली रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत चालक मद्याच्या प्रभावाखाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले.

चालकाचे नाव ऋषिकेश जगन्नाथ चिंचकर (वय २५, रा. PDCC बँकेसमोर, दर्ग्याशेजारी, आमराई, बारामती) असे निष्पन्न झाले.या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३६४/२०२६ नोंद करण्यात आला असून मोटार वाहन अधिनियमातील कलम १३०, १७७, १५८, १८५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १२२(घ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव विष्णू क्षीरसागर करीत आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली,

बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले, पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस हवालदार यशवंत पवार व पथकाने कारवाईत सहभाग घेतला.रात्रीच्या गस्तीला अधिक बळबारामती शहरात रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणारी संशयित वाहने, नंबर प्लेट नसलेली वाहने, वाहनांच्या कागदपत्रांतील अनियमितता तसेच मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालविणाऱ्यांविरोधात यापुढेही तपासणी सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी वाहन चालविताना वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहनावर नियमानुसार नोंदणी क्रमांक प्रदर्शित करावा आणि मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!