बारामतीतील लिअरजेट-४५ विमान अपघातानंतर VSR व्हेंचर्सवर DGCA ची कारवाई; विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी उघड

(प्रतिनिधी) – बारामती येथे घडलेल्या लिअरजेट-४५ (VT-SSK) विमान अपघातानंतर विमान सुरक्षा मानकांबाबत मोठी कारवाई करण्यात आली असून Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी संबंधित कंपनीचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. या तपासात देखभाल प्रक्रिया, विमान उड्डाण संचालन तसेच एअरवर्दिनेस संदर्भात अनेक नियमभंग आणि त्रुटी आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या अपघातानंतर DGCA च्या महासंचालकांनी VSR Ventures Pvt. Ltd. या संस्थेचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. बहुविभागीय तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आलेल्या या तपासात संस्थेच्या एअरवर्दिनेस, एअर सेफ्टी आणि फ्लाइट ऑपरेशन्स प्रक्रियेमध्ये मंजूर नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आले.

तपास अहवालानुसार, विमानांच्या देखभाल प्रक्रियेत गंभीर त्रुटी तसेच सुरक्षेसंबंधी आवश्यक मानकांमध्ये तफावत आढळल्याने तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या नोंदणी क्रमांकाच्या लिअरजेट ४०/४५ विमानांबाबत सातत्याने एअरवर्दिनेस मानके राखली जावीत, यासाठी विशेष निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय, आढळलेल्या नियमभंगांबाबत मूळ कारणांचा (Root Cause Analysis) सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी कंपनीला ‘डिफिशियन्सी रिपोर्टिंग फॉर्म’ जारी करण्यात आले असून पुढील मूल्यांकन DGCA मार्फत करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे खासगी विमान संचालन क्षेत्रात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत पुन्हा एकदा इशारा देण्यात आल्याचे विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!