सोमेश्वरनगर (ता. बारामती) – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच मु. सा. काकडे महाविद्यालय, वाघळवाडी–सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय ३५०० पदांचा महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
हा रोजगार मेळावा शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृह, मु. सा. काकडे महाविद्यालय परिसर येथे होणार आहे. विविध नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ३५०० रिक्त पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
या मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा तसेच विविध तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती व आवश्यक प्रमाणपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कौशल्य विकासाला चालना देणे आणि बेरोजगारी कमी करण्यास हातभार लावणे हा आहे.
परिसरातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे आणि सु. रा. वराडे. सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांच्या वतीने करण्यात आले आहे.
