पंचायत समिती माळशिरसमधील वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद

(माळशिरस प्रतिनिधी, दि. २४ फेब्रुवारी २०२६) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे (अॅन्टी करप्शन ब्युरो) यांनी मोठी कारवाई करत पंचायत समिती कार्यालय माळशिरस, जि. सोलापूर येथील वरिष्ठ सहाय्यकास ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आरोपी लोकसेवक सुंदरराव उत्तम नागटिळक (वय ५६ वर्षे), पद – वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कार्यालय माळशिरस, जि. सोलापूर (वर्ग-३) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ते पंढरपूर येथील प्रतिभाताई परिचारक नगर परिसरात वास्तव्यास आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय ३० वर्षे) हे इंजिनियर असून सरकारी कामांमध्ये सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. लक्ष्मी मजूर संस्थेला मौजे धर्मपुरी येथे सभामंडप बांधकामाचे काम मिळाले होते. सदर काम पूर्ण करण्यासाठी तक्रारदार यांची नियुक्ती करण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ९ लाख ७४ हजार ५७१ रुपयांचे बिल समाज कल्याण कार्यालय, सोलापूर येथे सादर केले होते.

काम पूर्णत्वाचा अहवाल (वर्क कम्प्लिशन सर्टिफिकेट) पंचायत समिती माळशिरस कार्यालयाकडून आवश्यक असल्याने आरोपी नागटिळक यांनी संबंधित बीडीओ यांच्या नावाने सुरुवातीला १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.

दि. १६ व १७ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान आरोपीने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालय माळशिरस येथे सापळा रचण्यात आला. आरोपी नागटिळक यांनी बीडीओ यांच्या सहीचा काम पूर्णत्वाचा अहवाल देत तक्रारदाराकडून सायंकाळी ३.०८ वाजता पंचासमक्ष ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी माळशिरस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाई पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शैलेश पवार करीत आहेत.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कोणतेही काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!