तलाठी कार्यालयात १० हजारांची लाच स्वीकारताना खाजगी इसम रंगेहाथ जेरबंद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

तासगाव (प्रतिनिधी, दि. २४ फेब्रुवारी २०२६) – तलाठी कार्यालयातील काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई तासगाव तालुक्यात करण्यात आली. या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खाजगी इसम संजय शंकर पवार (वय ५६, व्यवसाय शेती, रा. बस स्टॉप जवळ, शिरगांव (वि.), ता. तासगाव, जि. सांगली) यांनी तक्रारदार यांच्या जमिनीच्या रिकन्व्हेन्स दस्ताची नोंद सातबारा उताऱ्यावर करून मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तक्रारदार (वय ४१) यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली येथे दि. २९ जानेवारी २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान आरोपी पवार यांनी तलाठी कार्यालय शिरगांव (वि.), ता. तासगाव येथे दस्ताची नोंद करून देण्यासाठी स्वतःसह तलाठी यांच्या नावाने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढील चर्चेनंतर आरोपीने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचेची रक्कम १० हजार रुपये निश्चित केली.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. दि. २३ फेब्रुवारी रोजी तलाठी कार्यालय शिरगांव (वि.) येथे तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये लाच स्वीकारताना आरोपी संजय पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्रीमती यास्मीन इनामदार, पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, योगेश चव्हाण तसेच पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!