तांदुळवाडीत प्रेमीयुगुलावर कोयत्याने हल्ला; ३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल लुटणारे तिघे जेरबंद

बारामती : तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात प्रेमीयुगुलावर कोयत्याने हल्ला करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लुटणाऱ्या तिघा तरुणांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी येथील विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक परिसरात संतोष रायनवार (नाव बदललेले, वय २६, मूळ नागपूर, सध्या बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत बसले होते. त्याचवेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधून आलेल्या तिघा अज्ञातांनी लोखंडी सत्तूर व कोयत्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली.

फिर्यादीने विरोध केल्याने एका आरोपीने त्यांच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. त्यानंतर आरोपींनी सुमारे २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (अंदाजे किंमत ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये) आणि २ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला. ‘परत येथे दिसू नका’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६२) व ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार प्रसाद गणपत भोसले (वय २४), धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९) आणि कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!