बहिणीच्या बदनामीच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; चेंबूरमध्ये चाकूने भोसकून खून, आरोपी अटकेत

मुंबई, दि.२६ : मुंबई येथील चेंबूर परिसरात बहिणीची बदनामी करत असल्याच्या संशयातून एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित ऊर्फ छोटू राजनाथ विश्वकर्मा असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी आरसीएफ पोलीस स्टेशन पोलिसांनी प्रदीप गौडा या आरोपीला अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून आणि संशयातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित विश्वकर्मा हा चेंबूर परिसरात आई अमलादेवी व भावंडांसोबत राहत होता. तो भाऊ अनिल याच्यासोबत वेल्डिंगचे काम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी तो कामासाठी घराबाहेर पडला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने भावाला फोन करून ‘थोड्याच वेळात घरी येतो’ असे सांगितले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

रामटेकडी गार्डन परिसरात आरोपी प्रदीप गौडाने रोहितला अडवून जुन्या कारणावरून वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने रोहितच्या छातीत चाकूने खोलवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहितला तातडीने लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय (सायन रुग्णालय) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी रोहितचा भाऊ अनिल विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी प्रदीप गौडाला तीन बहिणी असून सुमारे सहा महिन्यांपूर्वी रोहितने त्याच्या एका बहिणीच्या वर्तणुकीबाबत माहिती दिल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. रोहित मित्रांमध्ये मिळून बहिणीची बदनामी करीत असल्याचा संशय आरोपीच्या मनात होता. यापूर्वीही त्याने रोहितला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून आरोपीला अटक केली असून मुंबई पोलीस पुढील तपास करत आहेत. परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!