सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठी घडामोड; अजितदादा पवार पॅनेलची अंतिम यादी समोर

२१ जागांसाठी उमेदवार निश्चित; ३० सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत

सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ची अंतिम यादी समोर आली आहे. पॅनेलच्या यादीत विविध गट व मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने मागील काही दिवसांपासून पॅनेल निश्चितीसाठी जोरदार खलबते सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये जागावाटप तसेच निवडणूक बिनविरोध करण्याबाबतही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनेलची उमेदवार यादी समोर आली आहे.

कोणत्या गटातून कोणाला संधी?

समोर आलेल्या यादीत कोळे-मोरगाव गट क्र. ३ मधून सर्वसाधारण प्रवर्गात रवींद्र जयवंतराव भापकर, मकरंद चंद्रकांत सस्ते आणि मनिषा आनंदकुमार होळकर यांचा समावेश आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून दरकोजी गुलाब साळवे यांचे नाव आहे.

को-हाळे गट क्र. ४ मधून सर्वसाधारण प्रवर्गात राजेंद्र हरिभाऊ बोरकर, अक्षय धनंजय खलाटे आणि सुनील नारायण भगत, तर महिला प्रवर्गातून प्रणिता मनोज खोमणे यांना संधी देण्यात आली आहे.

मांडकी-जवळकुंज गट क्र. ४ मधून सतीश संपत जगताप, सुधाकर ज्ञानोबा टेकवडे आणि उत्तम महादेव धुमाळ यांची नावे असून, महिला प्रवर्गातून छबूबाई अंकुश नारशिकर यांचा समावेश आहे.

निंबूत-खंडाळा गट क्र. १ मधून अभिजीत सतीश काकडे, प्रमोद भगवानराव काकडे आणि डॉ. श्री. वसंतराव रामराव दगडे यांची नावे आहेत. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातून शैलेश पंढरीनाथ रासकर आणि भटक्या-विमुक्त प्रवर्गातून अशोक चंद्रकांत धायगुडे यांचे नाव यादीत आहे.

मुरुम-वाल्हा गट क्र. २ मधून पुरुषोत्तम रामराजे जगताप, ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड आणि राजवर्धन शिवाजीराव शिंदे यांची नावे असून, ‘ब’ वर्गातून संग्राम तानाजी सोरटे यांचा समावेश आहे.

३० सप्टेंबरला माघारीची अंतिम मुदत

निवडणूक कार्यक्रमानुसार ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २ ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यामुळे आज दुपारी ३ वाजेपर्यंत कोण उमेदवारी कायम ठेवतो आणि कोण माघार घेतो, यावर अंतिम राजकीय चित्र अवलंबून राहणार आहे.

विशेष म्हणजे, २१ जागांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात असल्याने पॅनेलची अंतिम रचना आणि माघारीनंतरचे समीकरण याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. २९ सप्टेंबरपर्यंत प्रमुख पक्षांच्या अंतिम पॅनेलची उत्सुकता कायम असल्याचे वृत्त होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार पॅनेलची यादी समोर आल्यानंतर माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत आणखी कोणते बदल होतात, तसेच प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतात, याकडे सोमेश्वरसह संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे.

११ ऑक्टोबरला मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!