रोजगार सहाय्यकांच्या मागण्यांसाठी फलटण तालुका संघटनेचे तहसीलदारांना निवेदन ३ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

फलटण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक विकास युनियनच्या फलटण तालुका शाखेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

शासनाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी घेतलेला निर्णय रद्द करून ३ ऑक्टोबर २०२४ रोजीचा शासन निर्णय तातडीने लागू करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.संघटनेच्या म्हणण्यानुसार, राज्यातील प्रत्येक गावात रोजगार सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, अनेक रोजगार सहाय्यकांना शासनाने मंजूर केलेले मासिक मानधन नियमितपणे मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच रोजगार निर्मितीसाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या रोजगार सहाय्यकांवर उपासमारीची वेळ येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.निवेदनात रोजगार सहाय्यकांना सुरक्षा प्रदान करावी, तसेच शासन निर्णयानुसार मानधनाची अंमलबजावणी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास ३ ऑक्टोबर २०२६ पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा फलटण तालुका ग्रामरोजगार सेवक विकास युनियनने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!