बारामती, दि. ४ सप्टेंबर २०२६ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने शुक्रवारी टी. सी. कॉलेज परिसरात अचानक धडक नाकाबंदी केली.
या कारवाईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ७८ प्रकरणांत एकूण ५९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्याच्या १३ स्वतंत्र प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार आणि मा.
उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली टी. सी. कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नाकाबंदी करण्यात आली.या मोहिमेत वाहतूक शाखेचे १९ पोलीस अंमलदार आणि एक आर.सी.पी. पथक सहभागी झाले होते.
बारामती शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने वाहनांची तपासणी करण्यात आली.कोणत्या नियमभंगावर किती कारवाई?नाकाबंदीमध्ये नो पार्किंग, ट्रिपल सीट, परवाना नसणे, परवाना जवळ न बाळगणे, नंबर प्लेटमध्ये बदल अथवा तुटलेली नंबर प्लेट, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण, काळ्या काचा, एच.एस.आर.पी. नसणे तसेच वाहनात अनधिकृत बदल आदी प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये लायसन्स जवळ न बाळगण्याच्या ३६ प्रकरणांत २० हजार रुपये, तर ब्रोकन नंबर प्लेटच्या २१ प्रकरणांत १३ हजार रुपये दंड करण्यात आला. लायसन्स नसल्याच्या दोन प्रकरणांत १० हजार रुपये, नो पार्किंगच्या तीन प्रकरणांत २ हजार ५०० रुपये आणि काळ्या काचा असलेल्या तीन वाहनांवर ३ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
याशिवाय नो एन्ट्री, सीटबेल्टचा वापर न करणे, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे, विमा नसणे, रेड रिफ्लेक्टर नसणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गतही तपासणी करण्यात आली.
अल्पवयीनांच्या वाहनचालकांवर विशेष लक्षनाकाबंदीमध्ये अल्पवयीन मुला-मुलींकडून वाहन चालविले जात असल्याची १३ प्रकरणे समोर आली. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे त्यांच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्यमहाविद्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत परिसरात विनाकारण वाहने फिरविणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, छेडछाडीला कारणीभूत ठरणारे वर्तन, मोठ्या आवाजात किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणे तसेच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा प्रकारांवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
“महाविद्यालयात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला सुरक्षित वाटले पाहिजे. नियमांचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अथवा नागरिकांना बेदरकार वाहनचालकांमुळे त्रास होता कामा नये,” अशी भूमिका उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी व्यक्त केली.
अचानक नाकाबंदीचे सत्र यापुढेही सुरू राहणारमहाविद्यालये, शाळा, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक नाकाबंदी व वाहन तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.
विद्यार्थ्यांनी वैध वाहन परवाना असल्याशिवाय वाहन चालवू नये, ट्रिपल सीट प्रवास टाळावा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये, वेगाने अथवा बेदरकारपणे वाहन चालवू नये आणि वाहनाची नंबर प्लेट व आवश्यक कागदपत्रे नियमानुसार ठेवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.“नियम पाळणाऱ्यांना संरक्षण; बेदरकार वाहनचालकांवर कायद्याची सक्त कारवाई,” असा स्पष्ट संदेश बारामती वाहतूक शाखेने या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे.

