
बारामती , दि. ३१: २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही यादी तयार करण्यात आली असून, प्रारुप मतदार यादी सर्व मतदान केंद्र व तहसील कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
मतदार यादीबाबत दावे व हरकती २९ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदविण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.मतदार यादी तयार करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर निश्चित करण्यात आली आहे.
या अर्हता दिनांकाच्या संदर्भात मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी कोणत्याही दाव्याचा किंवा नावाच्या समावेशाबाबत आक्षेपाचा अर्ज संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात सादर करता येणार आहे.तसेच, १ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.पात्रतेनुसार प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून त्यावर नियमानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपले दावे किंवा हरकती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात, संबंधित निवडणूक विभागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा तहसील कार्यालय, प्रशासकीय भवन, पहिला मजला, बारामती येथे सादर करावेत, असे श्री.दिघे यांनी कळविले आहे.०००
