वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत धडक कारवाई केली असून, पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन मोटारसायकली तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे कानाडवाडी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपींची माहिती मिळविण्यात आली.पोलिसांनी राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा), सनी रमण भोसले (रा. राजकुम बंगला, सांगवी, ता. फलटण, जि. सातारा), पवन सँडल काळे (रा. मांगोमाळ, विडणी, ता. फलटण, जि. सातारा), बापूराव भानुदास चोपडे (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) आणि प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक (रा. मारवाडपेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांना ताब्यात घेतले.तपासात या आरोपींकडून विविध ठिकाणी करण्यात आलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती समोर आली. फलटण शहर, फलटण शहर पोलीस स्टेशन तसेच लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांशी आरोपींचा संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम ३०९ तसेच इतर लागू कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत.पोलिसांनी केलेल्या तपासात दोन मोटारसायकली व सोन्याचे दागिने असा एकूण ११,८९,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आणखी एका गुन्ह्याचा तपास सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभागाचे अधिकारी, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पोपट नाठे, अनिल खेडकर, आबा जाधव, नरेश यादव, धनंजय भोसले, हनुमान टेकेदार, सुरज धाने, भाऊसाहेब मारकड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.या गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते करीत आहेत.
