माळेगाव साखर कारखान्याला देशात अव्वल स्थान मिळवून देणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ठाम निर्धार

माळेगाव प्रतिनिधी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे सदिच्छा भेट देत कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. दिवंगत नेते अजित पवार यांचे माळेगाव कारखाना देशात अव्वल क्रमांकावर नेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेताना बोलताना त्या म्हणाल्या की, अजितदादांची दिवसाची सुरुवातच कारखान्याच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून होत असे. कारखान्याच्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. त्यांच्या निधनानंतर हे स्वप्न अपूर्ण राहू नये, यासाठी आता सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनंतर उपमुख्यमंत्रीपदासह पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी सक्रिय नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली असून, या पार्श्वभूमीवर माळेगाव कारखान्याला दिलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, अशा परिस्थितीत कारखान्यात येण्याची वेळ येईल, असा कधी विचारही केला नव्हता. मात्र दादांनी सुरू केलेली विकासाची वाटचाल थांबू देणार नाही. कारखान्याच्या हितासाठी त्यांनी अल्पावधीत अनेक निर्णय घेतले होते. आता त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करणे हीच खरी आदरांजली ठरेल.

कारखान्याच्या भविष्यातील नियोजनाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे यावर भर दिला जाणार आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावा आणि देशपातळीवर आदर्श ठरावा यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील.

सभासद, कर्मचारी वर्ग आणि शेतकरी बांधवांच्या सहकार्याने माळेगाव साखर कारखाना देशातील क्रमांक एकचा कारखाना बनवण्याचा आपला निर्धार असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना विकासाच्या या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!