बारामती प्रतिनिधी : राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातप्रकरणी चौकशीची मागणी आता अधिक तीव्र होत असून पवार कुटुंबीय आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. या प्रकरणात संबंधित विमान कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली असून त्यांना अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे.
दोन्ही नेत्यांनी व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेत बारामती पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तक्रारीवर एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. समर्थकांनीही घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
एफआयआर नोंद न झाल्याने संताप
पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला एफआयआर दाखल करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे सांगितले. तक्रार स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याने त्यांनी संबंधित विमान कंपनीवर गंभीर आरोप केले. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणी त्यांनी यापूर्वी मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस ठाणे येथेही तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला. मात्र तेथेही गुन्हा दाखल करण्यास नकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
DGCAच्या आदेशांमुळे संशय अधिक गडद
रोहित पवार यांनी अपघातात घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगत तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः Directorate General of Civil Aviation (DGCA) च्या परिपत्रकात व्हीएसआर कंपनीच्या २५ पैकी ५ विमाने उड्डाणातून थांबवण्याचे आदेश दिल्याने संशय अधिक बळावल्याचे त्यांनी म्हटले. नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची त्यांची मागणी आहे.
घटनास्थळी पाहिलेले भयावह दृश्य
अपघाताच्या दिवशीचा अनुभव सांगताना युगेंद्र पवार भावूक झाले. “मी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलो. सुरुवातीला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे वाहन थेट रनवेवर नेले. ११ क्रमांकाच्या रनवेच्या टोकाला सुमारे ५० फूट खाली विमान कोसळलेले दिसले. विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते,” असे त्यांनी सांगितले.
CID तपास योग्य दिशेने – एडीजीपी
दरम्यान, या अपघाताचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती Crime Investigation Department Maharashtra (सीआयडी) चे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. घातपात, निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी कृत्य झाले आहे का याचा सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती वैद्यकीय महाविद्यालय, फॉरेन्सिक प्रयोगशाळा तसेच केंद्रातील विविध तपास संस्था तपासात मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. एअरक्राफ्ट अपघात तपास समितीच्या अहवालाचाही विचार केला जात आहे. दोष सिद्ध झाल्यास योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तपासास कोणतीही निश्चित मर्यादा नसते, असा निर्देश Supreme Court of India यांनी दिल्याप्रमाणे सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे रामानंद यांनी सांगितले. गेल्या २८ दिवसांत मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा करण्यात आले असून उर्वरित पुरावेही लवकर जमा केले जाणार आहेत.
बारामतीत वातावरण तापले
दरम्यान, बारामती शहरात या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले. अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर एकवटले. ‘अमर रहे अजितदादा’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
नागरिकांनी अपघातामागील नेमके कारण समोर आणण्याची मागणी करत सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका घेतली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
युगेंद्र पवार यांनीही व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा हीच सर्व समर्थक आणि बारामतीकरांची भूमिका असल्याचे सांगत, “अजितदादांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका व्यक्त केली.
