तंत्रज्ञानामुळे संवाद बदलला; पण आजची तरुणाई भरकटलेली नाही — डॉ. नीलम गोऱ्हे यांचे मत

नाशिक प्रतिनिधी : आधुनिक तंत्रज्ञानामुळे संवादाची भाषा आणि पद्धत बदलली असली तरी आजची तरुण पिढी अजिबात बिघडलेली किंवा भरकटलेली नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग’ या विषयावरील विशेष व्याख्यान सत्रात त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमात अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनीही उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले. बदलत्या सामाजिक परिस्थितीचा तरुणांवर होणारा प्रभाव, कौटुंबिक मूल्यांमधील बदल आणि भाषेतील परिवर्तन यावर डॉ. गोऱ्हे यांनी सखोल भाष्य केले.

आजच्या तरुणांवर अनेकदा टीका केली जाते, मात्र ही पिढी चुकीच्या मार्गावर गेलेली नसून परिस्थितीनुसार बदल स्वीकारत आहे, असे त्यांनी नमूद केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे संवादाची शैली बदलली आहे. दर दहा वर्षांनी भाषेमध्ये नैसर्गिक बदल होत असतात, त्यामुळे भाषेच्या शुद्धतेचा अट्टाहास करण्यापेक्षा तिच्या भावनेला समजून घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईल हे प्रभावी संवाद माध्यम असले तरी त्याच्या अतिवापरामुळे काही नकारात्मक परिणामही होत असल्याची कबुली त्यांनी दिली. कोणती माहिती स्वीकारावी आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे, याचा विचार करण्याची क्षमता तरुणांनी विकसित करावी, असा सल्ला देताना “मिसळ चालेल, पण भेसळ नको” या उदाहरणातून त्यांनी सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.

राजकारण आणि सार्वजनिक जीवनाविषयी बोलताना जनतेचे आशीर्वाद आणि दिलेली आश्वासने या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याची व्यापक दृष्टी तरुणांनी अंगीकारली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

कौटुंबिक पातळीवरील बदलांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. एकत्र कुटुंब पद्धती कमी होत असल्याने पालक आणि मुलांमधील संवाद घटत चालल्याचे त्यांनी नमूद केले. शालेय शिक्षणासोबतच खासगी शिकवण्यांचा वाढता ताण आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे तरुणांमध्ये नैराश्य वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुलांना योग्य वेळी ‘नाही’ म्हणण्याची सवय पालकांनी लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भाषेतील प्रदूषणाबाबत बोलताना संस्कार केवळ पेहराव किंवा खाद्यसंस्कृतीपुरते मर्यादित नसून माणूस दुसऱ्याशी कसा वागतो यावर त्यांचे खरे मूल्य ठरते, असे त्यांनी अधोरेखित केले. मुलांना जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य, घरामध्ये सकारात्मक संवाद आणि समाजात समतेची भावना निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधान परिषदेच्या कामकाजाबाबत बोलताना लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत सभागृहात असंसदीय शब्दांचा वापर झाल्यास नियमांनुसार कारवाई करावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. जनतेच्या प्रश्नांना प्रसारमाध्यमांमध्ये योग्य प्रसिद्धी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्त्री-पुरुष समानतेच्या विषयावर बोलताना त्यांनी स्वतः लिखित ‘स्त्री-पुरुष समानता’ हे पुस्तक नेहमी सोबत ठेवत असल्याची आठवण सांगितली. तरुणांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. माणसाचे शब्द त्याचे विचार घडवतात, विचार कृतीत उतरतात आणि त्यातूनच चारित्र्य तयार होते. त्यामुळे आयुष्यात चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचा मोलाचा संदेश त्यांनी तरुणाईला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!