जिवासाठी धडपडणारे पोलीस; जलद कारवाईतून जखमीचा जीव वाचवून दोन आरोपी अटकेत

(बारामती प्रतिनिधी- दि.२३ फेब्रुवारी२०२६ ) बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेलच्या बिलाच्या किरकोळ वादातून एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमीचा जीव वाचवला असून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे, तर दोन जण सध्या फरार आहेत.

याबाबत गु.र.नं. 73/2026, भा.न्या.स. कलम 109, 61(2), 118(2), 351(2), 351(3), 3(5) अन्वये महेंद्र धोंडिबा गायकवाड (वय 53, रा. खांडज, ता. बारामती) यांच्या फिर्यादीवरून गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 21 फेब्रुवारीच्या रात्री हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून 22 फेब्रुवारी रोजी दुपारी मोरगाव रोडवरील ग्लोबल हॉटेलसमोर, प्रणव डिजिटल दुकानाजवळील मैदानात आरोपींनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. लाकडी दांड्याच्या कुऱ्हाडीने तसेच लोखंडी रॉडने उजव्या पायावर व छातीत वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. हल्ल्यावेळी एका आरोपीने “कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ,” अशी धमकी देत नागरिकांना दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमीस विलंब न करता उपलब्ध वाहनातून बारामती येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केल्यामुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीचा जीव वाचला. या घटनेमुळे पोलिसांची जलद निर्णयक्षमता आणि सजगता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विक्रम जगताप (रा. खांडज) आणि जयदीप भागवत भोसले (रा. पाहुणेवाडी) या दोघांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी अक्षय सुनिल जगताप (रा. माळेगाव कारखाना) व त्याचा साथीदार महादेव उर्फ भाऊ सुरेश जाधव (रा. ढवळेमळा) हे अद्याप फरार असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई संदीपसिंग गिल (पोलीस अधीक्षक), गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक), सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी) आणि श्रीशैल चिवडशेट्टी (प्रभारी पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री-दिवस परिश्रम घेऊन पुरावे संकलित करत आरोपींना ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दरम्यान, फरार आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!