बारामती, दि.6 एप्रिल : निरा नदी प्रदूषणाबाबत होत असलेले आरोप पूर्णपणे निराधार असून कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात नसल्याचा ठाम खुलासा श्री सोमेश्वर सह साखर कारखाना लि. प्रशासनाने केला आहे.
कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले की, काही व्यक्ती कोणताही ठोस पुरावा नसताना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवून कारखान्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आरोप वैयक्तिक स्वार्थातून किंवा गैरसमजातून करण्यात आले असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
कारखान्यात अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक ‘इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट’ (ETP) कार्यरत असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या प्रकल्पामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अशा तीन टप्प्यांत सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी सुरक्षित असून ते पुनर्वापरासाठी योग्य ठरते.
“झिरो डिस्चार्ज” संकल्पनेनुसार कारखाना कार्यरत असून, प्रक्रिया केलेले पाणी सिंचनासाठी तसेच कारखाना परिसरातील हरित क्षेत्रासाठी वापरण्यात येते. त्यामुळे नदीमध्ये कोणतेही सांडपाणी सोडले जात नसल्याचा पुनरुच्चार व्यवस्थापनाने केला.
दरम्यान, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कारखान्याने वाघळवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ३५ एकर क्षेत्रात ‘नक्षत्र वनउद्यान’ विकसित केले आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे ५५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यामध्ये २.५ एकर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने घनदाट वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे परिसरातील जैवविविधतेत वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.
या वनउद्यानासाठी कारखान्याकडून सुमारे ३ किलोमीटर लांबीची स्वतंत्र पाइपलाईन उभारण्यात आली आहे. ईटीपीमधून प्रक्रिया केलेले पाणी थेट उद्यानात पोहोचवले जात असून, मागील पाच महिन्यांपासून नियमित व शाश्वत पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.
उत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी या तिन्ही क्षेत्रांत संतुलित प्रगती साधणारा श्री सोमेश्वर सह साखर कारखाना हा परिसरासाठी आदर्श प्रकल्प ठरत असल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे.
