
बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील एमआयडीसी परिसरात यज्ञो कंपनीजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यज्ञो कंपनीजवळील रस्त्यावरून दुचाकीने जात असलेल्या दोन महिलांना भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या.घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी महिलांना बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोन्ही महिलांना मृत घोषित केले.मृत महिलांची नावे संगीता प्रदीप लोंढे (वय ३३) आणि मनीषा बबन शिंदे (वय ३३) अशी असल्याचे समोर आले आहे. दोन्ही महिला सातारा परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.अपघाताची तीव्रता मोठीप्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चारचाकी वाहनाचा वेग अधिक असल्याने दुचाकीला जोरदार धडक बसली. धडकेनंतर रस्त्यावर दुचाकीचे तुकडे तसेच वाहनाचेही नुकसान झाल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, चारचाकी वाहनाचा वेग किती होता तसेच वाहनचालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले होते का, याचा पोलीसांकडून तपास सुरू आहे. नातेवाईकांकडून सखोल चौकशीची मागणीया दुर्घटनेची सखोल चौकशी करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या चारचाकी वाहनचालकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत महिलांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.
अपघाताची वस्तुस्थिती स्पष्ट करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरूया प्रकरणाचा तपास एस. एम. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून अपघातातील वाहनांची स्थिती, घटनास्थळावरील पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती तपासली जात आहे.दरम्यान, बारामती एमआयडीसी परिसरातील या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
त्यामुळे भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच या भागातील वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.दोन महिलांचा या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
