रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला पवित्र सण अधिक आनंददायी करण्यासाठी पुणे टपाल क्षेत्राच्या बारामती विभागातील नागरिकांसाठी विशेष “वन स्टॉप राखी सोल्यूशन” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपक्रमांतर्गत राखी, भेटवस्तू आणि शुभेच्छा देशभरात तसेच जगभरातील आपल्या प्रियजनांपर्यंत सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्यासाठी सर्व टपाल कार्यालयांमध्ये एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रक्षाबंधनाच्या काळात राखी व भेटवस्तू वेळेत आणि सुरक्षितपणे पोहोचविणे हे प्रत्येक भावंडासाठी महत्त्वाचे असते. ही गरज लक्षात घेऊन पुणे टपाल क्षेत्राच्या बारामती विभागात विशेष राखी लिफाफे, सुरक्षित पॅकिंग, स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा तसेच ग्राहकाभिमुख सुविधा सुरू केल्या आहेत. त्यामुळे देशात किंवा परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना राखी पाठविणे आता अधिक सोपे, सुरक्षित आणि विश्वासार्ह झाले आहे.
पुणे टपाल क्षेत्राने बारामती विभागात रक्षाबंधन साठी सुरू केलेल्या ‘वन स्टॉप राखी सोल्यूशन’ अंतर्गत बारामती टपाल विभागातील बारामती, इंदापूर, सासवड, शिरुर, दौंड तालुक्यांमधील सर्व २६१ डाकघरांमध्ये लाडक्या बहिणींना आपली राखी भावापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी सर्व सुविधा या डाकघरांमध्ये मिळणार आहेत. तसेच या सुविधेमध्ये पार्सलने छान भेटवस्तू किंवा खाऊ पाठविण्याची देखील सोय आहे. परदेशात राखी पाठविण्याची सुविधा आता सब ऑफीससोबतच ग्रामीण भागातील सर्व शाखा डाकघरांमध्ये करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन श्री केतन शित्रे, अधीक्षक डाकघर बारामती यांनी केले आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल वर संपर्क साधावा. विकास गाढवे (९०९६५४४९९९), करुण सिंह (८००३२४०६२३), लालासाहेब जाधव (९८६०५८८६९९).
इंडिया पोस्ट – विश्वासाची परंपरा, सेवेची हमी आणि नात्यांना जोडणारा विश्वासू दुवा आहे.
